Thursday 16 August 2018

संकल्पनेतलं स्वातंत्र्य आम्हाला कधी मिळणार ?

१५ ऑगस्ट हा आपल्या भारतीयांचा स्वातंत्र्यदिन म्हणून आपण साजरा करतो. १९४७ साली भारतभूमी ब्रिटिशांच्या जुलमी राजवटीतून मुक्त झाली. भारताच्या स्वातंत्र्याला आता एकात्तर वर्षे उलटून गेली आहेत. परंतु अजूनही आपणास स्वातंत्र्याचा खरा अर्थ कळला असे म्हणणे धाडसाचेच ठरेल. पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारी हे दोन दिवस भारतीय नागरिकांसाठी राष्ट्रीय सण आहेत. भारत आज एक प्रबळ प्रजासत्ताक म्हणून जगामध्ये दमदारपणे वाटचाल करताना दिसते. स्वातंत्र्य मिळण्यासाठी असंख्य हुतात्म्यांची आहुती पडली, अनेक क्रांतिकारक फासावर गेले तेव्हा भारतीयांना स्वातंत्र्याचा प्रकाश दिसू शकला आहे. परंतु स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण केलेल्या देशभक्तांच्या बलिदानाची आज कुणालाच फिकीर नाही याचा अनुभव वारंवार येतो.
 
आपल्याला स्वातंत्र्य मिळण्यासाठी जितके कष्ट घ्यावे लागले त्यापेक्षा जास्त कष्ट आज स्त्री म्हणून समाजात सुरक्षितपणे जगण्यासाठी घ्यावे लागत आहे. माझ्या देशाला स्वातंत्र्य मिळाले पण त्यातून मी स्वतंत्र झाली का? मी का असे म्हणत असेल,
“पिता रक्षति कौमार्ये, भर्ता रक्षति यौवने
पुत्रश्च स्थाविरे भावे, न स्त्री स्वातंत्र्य मर्हती !”
कौमार्याचे रक्षण पिता करतो, तारुण्याचे रक्षण पती करतो, जेंव्हा मुलं मोठी होतात, तेंव्हा स्त्री त्यांच्या सरंक्षणावर अवलंबून असते. स्त्री स्वतंत्र नाहीच. मनुस्मृती मध्ये मनुने एवढ्या वर्षापूर्वी लिहुन ठेवलेले हे वचन आज या घडीला ही तितकेच सत्य आहे.
भारतीय राज्यघटनेच्या प्रास्ताविकेत सर्व भारतीय नागरिकांना वैचारिक आणि अभिव्यक्तीच्या स्वातंत्र्य असल्याचा समावेश आहे. भारतीय राज्यघटनेच्या कलम १९ मध्ये या स्वातंत्र्याचा पुनरूच्चार केला आहे. योगायोग असा की, मानवाधिकाराच्या वैश्विक घोषणापत्राच्याही १९ व्या क्रमांकाच्या कलमात अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा उल्लेख आहे.

“स्वातंत्र्य म्हणजे व्यक्त होण्याची मुक्तता असणं. कुठलीही संवेदना व्यक्त करताना त्यावर बंधन नसणं म्हणजे स्वातंत्र्य. हवं तस जगता येण म्हणजे स्वातंत्र्य.”

स्त्री-स्वातंत्र्याबद्दल कायमच विविध चर्चामध्ये, कार्यक्रमांमध्ये बोलले जाते. स्वतंत्र विचार करणाऱ्या व स्त्री-स्वातंत्र्य देशाच्या उन्नतीसाठी अत्यावश्यक आहे.

‘भारताला १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य मिळाले खरे. पारतंत्र्याचा सूर्य मावळला, मात्र अजूनही स्वातंत्र्याचा प्रकाश सर्वत्र लख्ख पडतोय का? हा प्रश्न मनात येतो जेव्हा रोजच वर्तमानपत्रांत स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचारांच्या बातम्या आपण वाचतो.

नावापुरते स्वातंत्र्य मिळाले म्हणजे सगळे साध्य झाले असे नाही. दिल्ली-मुंबईसारख्या शहरांमध्येही जर मुलींना सुरक्षित वाटत नाही, तर हे मिळालेले स्वातंत्र्य काय कामाचे? सध्या अनेक ठिकाणी बोलले जाणारे, मात्र फक्त चर्चेचा विषय ठरलेले असे हे ‘स्त्री-स्वातंत्र्य’ अनेक घटना घडतात त्यावर चर्चा होतात, मोर्चे निघतात, मात्र पुढे काय?.. सारे शून्यच. सारेच थंड होते, कारण एका गोष्टीचा अंत होण्याआधीच दुसरीचा प्रारंभ होतो. मग ‘स्वातंत्र्य’ नक्की कोणाला मिळाले? भारतीय नागरिकांना की दुष्ट कृत्य करणाऱ्या व्यक्तींना?
माणसाला जन्म देणारी ही स्त्री आहे, मग मुलीला आईच्या उदरात मारून जन्माला येण्यापूर्वीच तिचे ‘स्वातंत्र्य’ का हिरावले जाते?

स्त्री दुर्बल नाही, ती सामर्थ्यवान आहे, पुरुषांच्या बरोबरीची आहे, तिला आश्वासनांची आणि कोणत्याही नुकसानभरपाईची नाही, तर निव्वळ आणि निव्वळ ‘स्वातंत्र्याची’ गरज आहे.’

नॅशनल क्राइम रिकॉर्ड ब्यूरोच्या रिपोर्टनुसार –
“नॅशनल क्राइम रेकॉर्ड्स ब्युरो २०१४च्या अहवालानुसार देशात दररोज एका तासाला चार बलात्कार होतात. म्हणजेच  दर १४ मिनिटाला १ बलात्कार होतो. २०१४ मध्ये संपूर्ण देशात ३६,९७५ बलात्काराच्या घटना घडल्या आहेत.

सगळ्यात जास्त प्रमाणात बलात्कार होणारे राज्य –
“नॅशनल क्राईम रेकॉर्डस् ब्युरोच्या २०१६च्या अहवालानुसार, २०१५ च्या तुलनेत भारतात बलात्काराच्या घटनांमध्ये २०१६ मध्ये १२.४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. देशात ३८,९९७ बलात्काराची प्रकरणे नोंदवण्यात आली. मध्यप्रदेश राज्यात सर्वाधिक गुन्हे नोंदवण्यात आले आहेत, कारण सर्वात जास्त बलात्काराच्या घटना – मध्य प्रदेशमध्ये ४,८८२ गुन्हे दाखल आहेत. त्यानंतर उत्तरप्रदेश दुस-या क्रमांकावर ४,८१६ बलात्काराचे गुन्हे दाखल झाले आहेत. तर महाराष्ट्र राज्य ४,१८९ या संख्येने तिसऱ्या क्रमांकावर आहे.

निर्भया, छकुली असिफा आणि अजून कितीतरी –
 दिल्ली असो, कोपर्डी किंव्हा उन्नाव या तीनही घटनांमध्ये माणुसकीला काळिमा फासला गेला आहे. देशभरातून नाही तर जगभरातून या घटनेचा निषेध व्यक्त केला गेला. मात्र न्याय कोणाला मिळाला? कोपर्डी केसच्या बाबतीत वैद्यकीय अहवाल हा मानवी मनाला सुन्न करणारा होता. त्यानंतर सुद्धा ह्या घटना थांबल्या नाहीच.
सध्याच्या जगात मुली आणि महिलांना जेवणाची थाळी समजलं जातं. जेवल्यानंतर थाळी जशी फेकून दिली जाते, तसं विनयभंग करा आणि दुसरीकडे फेकून द्या, अशी मानसिकता आहे. म्हणून मला वाटतं की असं कृत्य करणाऱ्यांची समाजात राहण्याची लायकी नाही.

कोपर्डीतल्या घटनेनंतर महाराष्ट्रात अनेक निषेध करणारे मोर्चे निघाले. निर्भयानंतरही वातावरण तापलं होतं. लोक रस्त्यावर उतरले. लोकांच्या रोषामुळं काही सकारात्मक बदल होत आहेत, असं वाटतं का?
बघा, जे काही होत आहे, ते फक्त बोलण्यापुरतं आहे. अगदी असंही नाही म्हणता येणार की काहीच बदललं नाही.

पण याबाबतीत फारशी प्रगती झालेली नाही. कारण इतक्या घटना रोज समोर येतात. कधी कुठला नेता पुढे येऊन नाही म्हणाला की, अशी घटना घडली आहे. आणि त्यासाठी सरकारने ही पावलं उचलली आहेत.
निर्भया प्रकरणानंतर सरकारनं काही पावलं उचलली. कायद्यात बदल केले. त्यानंतर महिला आज सुरक्षित आहेत, असं वाटतं का?

स्वातंत्र्याच्या बाता मारताना आपण 2022 पर्यंत भारताला विश्वगुरु बनवण्याची स्वप्न बघतो तर दुसरीकडे आज किती तरी स्त्रिया मुकतायत जन्माला येण्याच्या स्वातंत्र्याला..
छोटय़ा छोटय़ा गोष्टींतही स्त्रीने आपल्यावर मात करत,
जरा पुढचं पाऊल टाकलं, तर आमचा पुरुषी इगो दुखावला म्हणून तिच्यावर अॅसिड फेकून तिच्या स्वातंत्र्याचा बळी घेतला जातो.

खरंच आम्हाला मिळालंय का स्वातंत्र्य? या 71 वर्षांत,
विचाराच्या बंदिवासातून नाही करू शकलो स्वत:ला मुक्त आणि याला.. यालाच म्हणायचं का स्वातंत्र्य!
किती दिवस पाठ फिरवून मागे पळत राहणार..
कधी तरी हा वणवा तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचणार..

संकल्पनेच्या स्वातंत्र्याचा आपण विविध अंगांनी विचार करायला हवा. मनुष्य ज्या अनुभवातून जातो, जे विचार करतो, ज्या कृती करतो, ज्या परिस्थितीला तोंड देतो, या सर्वच बाबींवर त्याच्या एखाद्या विषयाच्या संकल्पना तयार होतात किंवा एखाद्या विषयाकडे बघायचा दृष्टिकोन बदलतो. पारतंत्र्यामध्ये असताना स्वातंत्र्याची व्याख्या परकीय आक्रमकांच्या बंधनातून मुक्त होणं ही असते, त्यानंतर समाजातील सर्व घटकांना समान न्याय मिळणे असा स्वातंत्र्याचा अर्थ लावला जातो व पुढची पायरी म्हणजे विचार-आचार-उच्चार तसेच व्यक्तिस्वातंत्र्य…
या सगळ्याचा विचार करताना ‘स्त्री’ समाजाचा अविभाज्य घटक आहे हे 21 व्या शतकापर्यंत सांगावे लागते हेच खरे दुर्दैव आहे.

असो! महिलांनो “उठा, जागे व्हा, हीच योग्य वेळ  आहे…….

स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देताना, आपण एक व्यक्ती म्हणून कोणत्याही दुसऱ्या व्यक्तीच्या स्वातंत्र्यावर गदा तर आणत नाही ना, त्यांच्या मूलभूत हक्कांची गळचेपी तर करत नाही ना, समाजात असणारा एकोपा, सलोख्याचे संबंध, शांतता आपल्या चुकीच्या वर्तनाने बिघडत तर नाही ना, याचा एकदा विचार करूनच ह्या स्वातंत्र्य दिनी इतरांना स्वातंत्र्याच्या शुभेच्छा द्या…
जय हिंद !

अमृता आनप
 https://marathi.netive.in/author/amrutaanap/

No comments:

Post a Comment