Tuesday 6 September 2016

आपला माणूस, वर्दीतला माणूस ! मंगळवार, ०६ सप्टेंबर, २०१६

महान्यूज 
आपला माणूस, वर्दीतला माणूस ! मंगळवार, ०६ सप्टेंबर, २०१६

म.पो... महाराष्ट्र पोलीस.. आपल्या रक्षणासाठी सदैव तत्पर. आपल्या रक्षणासाठी ''सद्रक्षणाय खलनिग्रहणाय'' हे महाराष्ट्र पोलिसांचे ब्रीदवाक्य आहे. याचा अर्थ असा की, महाराष्ट्र पोलीस सज्जनांचे रक्षण करण्यास आणि दुर्जनांवर नियंत्रण ठेऊन त्यांचा नायनाट करण्यास कटीबद्ध आहेत.

पोलीसदल हे शासनाच्या नेतृत्वाखाली लोकांच्या संरक्षणासाठी असणारे असे भक्कम दल आहे, ज्यांच्यावर सामान्य नागरिकांपासून ते सर्वच मोठ्यास्तरातील लोकांच्या सुरक्षा व्यवस्थेची जवाबदारी असते. उन्हातान्हात, पाणी पावसात, वादळ वाऱ्याला झुंज देत आपले महाराष्ट्र पोलीस स्वतःच्या जीवाची परवा न करता हजर असतात. मोर्चा असो किंवा आंदोलन, राजकीय सभा असो किंवा दंगल आपल्या पोलिसांना सतत जागरूक राहून त्यांचे कर्तव्य पार पाडावे लागते. ही बाब लक्षात घेऊनच शासनाने नुकताच लोकराज्य मासिकाचा 'आपले पोलीस' हा विशेषांकही प्रसिद्ध केला आहे.

पोलिसांना त्यांचे कर्तव्य बजावताना अनेक अडचणी येत असतात तरी ही त्या अडचणीवर मात करून ठामपणे उभं राहून वर्दीतला माणूस आपले कर्तव्य बजावत असतो. फक्त लोकांचे रक्षण करणे आणि समाजात शांतता सुव्यवस्था निर्माण करणे याशिवाय विचारांच्या पलीकडे प्रत्येक क्षेत्रांत पोलीस आपले काम कोणतीही तक्रार न करता करत असतात. हत्या, चोरी, खून, घातपात अशा घटनांचा शोध घेणे, अपघातस्थळी जाऊन त्याबद्दल सविस्तर माहिती घेणे, पासपोर्ट कागदपत्रांची पडताळणी करणे, घरगुती हिंसा हाणामारी नवरा बायकोची भांडणे सोडवणे, रस्त्यावर होणाऱ्या वाहतूककोंडीची समस्या सोडवणे, आग लागल्यास त्यावेळी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता लोकांची मदत करणे, हरवलेल्या व्यक्तीला शोधण्यापासून ते दुष्काळ, भूकंप, त्सुनामी सारख्या नैसर्गिक आपत्तीमध्ये सुद्धा पोलीस कटाक्षाने आपली कामगिरी बजावत असतात.

पोलिसांची कामगिरी इकडेच थांबत नाही तर क्रिकेट मॅच, सिनेतारकांचे कार्यक्रम, जाहीर सभा, गणपती विसर्जन, जुम्मे की रात, ईद, महत्त्वाच्या लोकांचे भाषण या सर्व ठिकाणी पोलिसांची उपस्थिती अनिवार्य असते. 12 महिने 365 दिवस पोलीस स्टेशन चालू असते. सणासुदीला आपण सगळे आपल्या कुटुंबासोबत मज्जा करत असतो तेव्हा रस्त्यावर कुठे तरी तासन्तास उभं राहून पोलीस आपली ड्युटी करत असतात. कारण पोलिसांना सुट्टी नसते.

आपण आपल्या छोट्या-छोट्या मागण्या पूर्ण करण्यासाठी रस्त्यावर येतो, भांडण करतो उगाच जाळपोळ करून आपल्याच संपत्तीच नुकसान करतो. तेव्हा पोलीस बंदोबस्तासाठी उभे असतात आपलं म्हणनं शांतपणे ऐकून घेण्यासाठी. पण आपण काय करतो, पोलिसांची भूमिका समजून न घेता समोरच्यावर बोट दाखवून मोकळे होतो.

आपण स्वत: जर नियमांचे पालन केले, समाजात शिस्त निर्माण करून आधी स्वतःला थोडी शिस्त लावली तर बांद्रासारख्या ठिकाणी स्वत:चे कर्तव्य पार पाडणाऱ्या स्व. विलास शिंदेचा दुर्देवी मृत्यू झाला नसता. आपल्या मनात पोलिसांबद्दल आदरयुक्त भीती हवीच कारण पोलिसांच्या टोपीचा हेवा प्रत्येक जणाला वाटतो. पण अनेक अडथळे समस्या झेलून त्या टोपी मध्ये किती घाम येतो हे त्या पोलीस कर्मचाऱ्यांनाच माहित असते. कुजलेल्या अवस्थेत असणाऱ्या एका मृत देहाजवळ ज्यातून प्रचंड घाण वास येत होता अशा ठिकाणी पोलीस तैनात होते, जिकडे सामान्य नागरिक जाण्यास ही नाक मुरडत होते. मदत तर खूप दूरच राहिली अशा परिस्थितीत पोलिसानी तो मृतदेह बाहेर काढला. मग पोलीस सामान्य नागरिक नाही का? ते कोणत्या श्रेणीत येतात. तरीही कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्र पोलीस न डगमगता आपल्या पराक्रमाने दाखवतात.

जिगर, साहस आणि शौर्य. 26/11 च्या भ्याड हल्यात शहीद झालेले वरिष्ठ पोलीस अधिकारी सर्वश्री करकरे, कामटे, साळसकर आणि एके 47 शी दोन हात करून आपल्या जीवाची पर्वा न करता जिवंत कसाबला पकडणारे शहीद तुकाराम ओंबळे म्हणजे आमचे महाराष्ट्र पोलीस.. ज्यांचा आपल्याला मनापासून आदर हवाच. 24 तास काम कराव लागेल या अटी मान्य करून एक सामान्य व्यक्तिमत्व आयुष्यभर असामान्य काम देखील करत असत. ज्यांना सुट्या नसतातच हे म्हणणे वावगे ठरणार नाही.

कधी हजारोंच्या तर कधी लाखो लोकांच्या गर्दीत वर्दीतला माणूस आपल्या वैयक्तिक जीवनातील ताण-तणाव, चिंता विसरून फक्त आणि फक्त निस्वार्थ काम करत असतो. अशा पोलिसांकडून शांत आणि सामंजस्याच्या वागणुकीची अपेक्षा करण्यापेक्षा त्यांना आपल्या सहानभुतीची किती गरज आहे याचा विचार एक माणूस म्हणून नक्की करायला हवा.

गणपती उत्सव सध्या सुरू आहे. चौकात, नाक्यावर, मोठमोठ्या गणेश मंडळात कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांना तैनात केले असणारच, अशा गर्दीच्या ठिकाणी प्रचंड शारीरिक, मानसिक त्रास सहन करून आपले पोलीस मित्र कार्यरत असणार. त्यांना योग्य ते सहकार्य करून एक नागरिक म्हणून आपण आपले कर्तव्य पार पाडूया. जयहिंद.
अमृता आनप
amrutahanap23@gmail.com
'महान्यूज' (www.mahanew.gov.in) मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.

Friday 5 August 2016

*लग्नाचा जोडीदार कसा हवा? या विषयासंबंधी केलेल्या सर्वेक्षणाचा निष्कर्ष...!!*

*लग्नाचा जोडीदार कसा हवा? या विषयासंबंधी केलेल्या सर्वेक्षणाचा निष्कर्ष...!!*
'आपल्याला ज्या व्यक्तीसोबत उरलेले संपूर्ण आयुष्य काढायचे तो, विचारांनी परिपक्व, उच्चशिक्षित, वेलसेटल तर हवाच, पण मुख्य म्हणजे तो ओपन माईंडेड असावा. म्हणजे अर्थातच तो पत्नीवर दृढ विश्‍वास ठेवणारा असावा...' ही आहे आधुनिक युगात वावरणाऱ्या मुलींची भावी नवऱ्याबद्दलची संकल्पना...
खरं तर, मुलीच्या लग्नाचा विषय आला, की आई-वडील वरसंशोधनाच्या कामात व्यस्त असतात. ते इतके व्यग्र होऊन जातात, की स्थळ त्यांना पटलं की मुलीच्या भावभावनांचा विचार न करताच त्यांच्या कल्पनेनुसार चांगलं वाटणारं स्थळ ते नक्की करतात. हे करताना आई-वडिलांना केवळ आर्थिक आणि बाह्य स्थितीची कल्पना असते. अर्थातच मुलाचा स्वभाव, आचरण या बाबींचा विचारही कधी केला जात नाही आणि त्यांच्या लेखी या बाबीला तसे महत्त्वही दिले जात आहे. पण, आजच्या महाविद्यालयीन तरुणी आपल्या भावी पतीबद्दल ज्या अपेक्षा बाळगून आहेत, नवऱ्याबाबत त्यांच्या ज्या संकल्पना आहेत त्या नेमक्‍या मुलाच्या व्यक्तिगत आचार-विचारांशी संबंधितच असल्याचे दिसून आले. प्रत्यक्षात जोडीदार शोधताना मुलींच्या भावनांना किती मोल दिलं जातं हा संशोधनाचा विषय आहे. आपल्या आयुष्याचा जोडीदार निवडताना काहीतरी साम्य असायला हवे. या बरोबरच एकमेकांबरोबर कंफर्टेबलही वाटायला हवे, असे अनेक तरुणींचे म्हणणे आहे.
*गुण-दोषांसकट स्वीकार-*
लग्नाच्या रेशीमगाठी म्हणजे एकमेकांच्या साथीने आयुष्यातील सुख-दुःखाचे क्षण संयुक्तपणे अनुभवण्याचं दिलेलं अभिवचन. यासाठी काही जुजबी गोष्टींपेक्षाही आवश्‍यक असतात, ती एकमेकांची मनं जुळणे. ठराविक चौकटीतील गोष्टी जुळल्या, की खरंच ही मनं जुळतातच असे नाही. त्यामुळे आताच्या मुली आपल्या जोडीदाराला त्याच्या गुण-दोषांसकट स्वीकारण्याची मानसिकता ठेवतात. प्रत्येकात काही ना काही तर कमी असणारच आणि आपण कुठे सर्वगुण संपन्न आहोत, असा विचार करणाऱ्या मुलींची 90 टक्के संख्या दिसून आली आहे.
*नवरा हवा खुल्या मनाचा-*
मुलींमध्ये उच्चशिक्षणाचे प्रमाण वाढले आहे. याचबरोबर शाळेत, महाविद्यालयात आणि नोकरीच्या ठिकाणी मित्रांबरोबर मिळणारी समान वागणुकीमुळे मुला-मुलींमधील मैत्रीकडे पाहण्याचा दृष्टिकोनही बदलला आहे. महाविद्यालयीन ग्रुपमध्ये अनेक मुले-मुली एकमेकांचे जिवाभावाचे मित्र-मैत्रीण असतात. त्यामुळे आता "एक लडका और लडकी के बीच कभी सिर्फ दोस्ती नहीं हो सकती', हा समज गळून पडला आहे. याचाच स्वीकार करणारा आणि आपल्या पत्नीला इतरांशी बोलण्याचे आपले मत मांडण्याचे संपूर्ण स्वातंत्र्य देणारा मुलगा जोडीदार म्हणून हवा, असे 80 टक्के मुलींचे म्हणणे आहे.
*दिसण्यापेक्षा असणं महत्त्वाचे-*
बहुधा आयुष्याचा जोडीदार निवडताना स्त्री-पुरुष एकमेकांचे सौंदर्य जोखून पाहतात. जोडीदार निवडण्याचा काळ हा वयात येतानाच साधारणपणे असतो. जोडीदार निवडीचा पहिला निकष सौंदर्य हाच असतो ही विचारसरणी देखील आता मागे पडली असून, आपल्या जोडीदाराच्या दिसण्यापेक्षा त्याचे समाजातील अस्तित्व, वागणूक म्हणजे चारचौघात त्याच्या असण्याने काय फरक पडतो, याबाबत मुली चोखंदळ असल्याचे दिसते. मुलाचा स्वभाव मनमिळाऊ आणि समजूतदार असला, तर त्याचे दिसणे, काळा-गोरा या गोष्टी खूप महत्त्वाच्या नसल्याचे सुमारे 80 टक्के तरुणींचे मत चर्चेतून समजले.
*तरुणी म्हणतात..*
जीवनशैली झपाट्याने बदलत आहे. त्यामुळे समाजातील बदल स्वीकारून आपल्या पत्नीला एक स्री म्हणून वागविण्यापेक्षा एक व्यक्ती म्हणून वागविणारा व संपूर्ण स्वातंत्र्य देणारा खुल्या मनाचा जोडीदार मला हवा आहे.

Friday 29 July 2016

बदलत्या तंत्रज्ञानाची लोकशिक्षणात भूमिका...........


शिक्षण व्यवस्थेतील बदलासाठी इंटरनेटचे महत्त्व पटवून देण्यासाठी सध्या विविध मोबाईल कंपन्याची चढाओढ लागली आहे… कोणी आयआयटीमध्ये जाण्यापेक्षा इंटरनेटच्या सहाय्यानेच आयुष्य कसे बदलेल याची आयडीया सुचवित आहे… तर कोणी इंटरनेटच्या सोबतीने पाहिजे ती गरज स्वत:च भागवू शकत असल्याचे सांगत आहे…या जाहिरातींनी
शिक्षणात आता टेक्नॉलॉजीची आवश्यकता असल्याची गरज हेरली आहे… हे खरं आहे… पत्रकारितेची विद्यार्थी म्हणून या जाहिरातींचा अभ्यास करीत असतानाच आज मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे यांनीही अशीच गरज अधोरेखील केली. 


माहिती व जनसंपर्क विभागात आतंरवासिता करीत असताना मला दररोज नवनवीन अनुभव येत आहेत… याच श्रृंखलेत आज थेट कुलगुरूंशी संवाद साधण्याची संधी मिळाली… ‘बदलत्या तंत्रज्ञानाची लोकशिक्षणात भूमिका’ याविषयावर आधारित व्याख्यानातून शिक्षणतज्ज्ञ व कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे यांनी दर्जेदार शिक्षणप्रणाली आपली प्रखर मत मांडून आम्हा विद्यार्थ्यांना शिक्षणप्रणालीकडे पाहण्याची एक नवीन दृष्टी दिली… या कार्यक्रमाला संचालक अजय अंबेकर, संचालक (प्रशासन) देवेंद्र भुजबळ, संचालक (माहिती) शिवाजी मानकर यांच्यासह माहिती विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

दिवसेंदिवस शिक्षणाचा खर्च वाढत आहे. पहिले काही हजारात मिळणाऱ्या शिक्षणाचा आकडा आता लाखोंचा घरात पोहोचला आहे… हे थांबविण्यासाठी सरकार आपल्या पद्धतीने प्रयत्न करीत आहे. पण या समस्येचे उत्तर तंत्रज्ञानात आहे. नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर आपल्या शिक्षण प्रणालीत केल्यास चार भिंतींच्या आड मिळणारे ज्ञान ‘मुक्त’ होऊन ज्ञानगंगा घरोघरी पोहोचेल असा विश्वास डॉ. साळुंखे यांनी व्यक्त केला.

एक विद्यार्थी म्हणून यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या कुलगुरुंचे तंत्रज्ञानाची लोकशिक्षणात मुख्य भूमिका आहे असे सांगितले. बदलत्या तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करता येऊ शकतो. ज्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांलाही फायदा होईल अशी खात्री पटली. डॉ. माणिकराव साळुंखे यांच्या जीवनावर प्रकाश टाकताना भुजबळ सरांनी सांगितले की, त्यांनी आजपर्यंत ४० विद्यार्थ्यांना पीएचडीसाठी मार्गदर्शन केले आहे. सेंद्रीय रसायन शास्त्रात त्यांनी स्वत: पीएचडी केलेली हे ऐकूनच मी अवाक झाले. शिक्षण पद्धतीत काम करणारे लोक विद्यार्थ्यांना नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती, नवे अभ्यासक्रम, कोर्सेस, देण्यासाठी झटत आहेत. इतका मोठा अनुभव असून सुद्धा आम्हा विद्यार्थ्यांशी त्यांनी मुक्तपणे संवाद साधला याचे अप्रुप वाटले.

एक विद्यार्थी म्हणून शिक्षण पद्धती विषयी माझ्या मनात अनेक प्रश्न होते ज्याची उत्तरे कुलगुरू साळुंखेनी सहज आणि सोप्पी करून सांगितली. आमच्याशी संवाद साधत असताना त्यांच्या समृध्द संशोधनाची प्रचिती वेळोवेळी येत होती. विद्यार्थ्यांना भारतात उपलब्ध असणाऱ्या तंत्रज्ञानाची माहिती देत असताना त्यांनी विदेशातील शिक्षण क्षेत्रातील तंत्रप्रणाली देखील उलगडून सांगितली. शिक्षण ही लाईफ लाँग जर्नी आहे हे त्यांनी त्यांच्या अनुभवातून समजावनू सांगितले. ज्ञानगंगा घरोघरी हे नाशिक विद्यापीठाचे ब्रीदवाक्य कशा प्रकारे सार्थ आहे, हे डॉ. साळुंखेंच्या अनुभवातुन मला समजले. व्याख्यानमालेच्या उत्तरार्धात आम्हा विद्यार्थ्यांकडून विचारण्यात आलेल्या प्रश्नांची त्यांनी मनमोकळी उत्तरे दिली. या कार्यक्रमात माहिती जनसंपर्क महासंचालनालयाचे अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते ज्यांनी विद्यार्थ्यांना प्रश्न विचारण्यासाठी प्रोत्साहन दिले. अशा दिग्गज व्यक्तींकडून शिक्षण क्षेत्राविषयी येणाऱ्या नवीन तंत्रज्ञान, ॲप्स, कोर्सेसविषयी माहिती जाणून घेण्याची मला संधी मिळाली याचा मला खूप आनंद आहे. माझ्या भावी आयुष्यात बदललेल्या तंत्रज्ञानाचा उपयोग माझ्या शिक्षण प्रवासात होईल. एवढं मात्र नक्की.
-अमृता आनप