Tuesday 31 July 2018

भ्रष्टाचार निवारण विधेयक २०१८ लागू ..'लोकपाल'चे काय ?

भारताच्या राजकारणात भ्रष्टाचार हा मुद्दा नेहमीच गाजत असतो. मागील ४० वर्षांपासून जनलोकपाल आणि सरकार यांचा तिढा कायम आहे. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे सरकार असताना हे विधेयक संसदेत मांडण्यात आले होते.२०१८ साली भ्रष्टाचार निवारण करण्यासाठी राज्यसभेत भ्रष्‍टाचार विरोधक संशोधन विधेयक २०१८ पारित केले गेले.
या कायद्याअंतर्गत, लाच देणारा आणि लाच स्वीकारणारा दोन्ही ही व्यक्ती शिक्षेस पात्र असणार आहेत.
लाच देणाऱ्याला सात वर्षांचा कारावास किंवा दंड आकारणी दोन्हीपैकी एक आहे. असे असले तरी त्यांना त्यांची बाजू मांडण्याकरिता ७ ते १५ दिवसांचा वेळ दिला जाणार आहे
याउलट लाच घेणाऱ्यासाठी जास्तीत जास्त ७ वर्ष कारावासाची शिक्षा आणि किमान तीन वर्षांची शिक्षा आणि सूट देण्याची तरतूद आहे. राज्यसभेत १९ जुलैला हा कायदा लागू करण्यात आला आहे. या कायद्यात १९८८ मध्ये मूळ कायद्याची अंमलबजावणी करण्याची तरतूद करण्यात आली आहे.
केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंग यांनी सांगितले की,
गेल्या चार वर्षात आमचे सरकार या दिशेने कटीबद्ध असून असे कायदे होण्यासाठी पुढाकार घेत आहे. त्याचे उदाहरण म्हणजे भारतातील जनतेचा मोदी सरकारवर विश्वास आहे. म्हणूनच सरकार नोटबंदीसारखा निर्णय घेऊ शकली. हा कायदा लागू करताना आम्ही बरेच संशोधन केले आहे. या कायद्या अंतर्गत प्रामाणिकपणे काम करणाऱ्या लोकांना दबाव देणाऱ्या लोकांच्या विरोधात हा कायदा नक्कीच कारवाई करेल. हा कायदा लागू करताना झालेल्या चर्चे दरम्यान अनेक सदस्यांनी लोकपालच्या नियुक्तीसंबंधी प्रश्न उपस्थित केला. यावर जितेंद्रसिंह यांनी सांगितले की लोकपालाची नियुक्ती झालेली नाही. या संबंधात प्रक्रिया चालू आहे या विषयावर संशोधन कमिटीची स्थापना करण्याबाबत १९ जुलै रोजी बैठक झाली. हे बरोबर आहे की लोकपालच्या नियुक्तीमध्ये विलंब झाला आहे. 'पण उशीर होण्यामागे सत्तेत असणारा भाजप पक्ष नसून काँग्रेस पार्टी आहे. विरोधी पक्षात हव्या तितक्या जागा त्यांच्याकडे नाही. देशाच्या जनतेने कॉंग्रेसला फक्त ४४ जागा दिल्या आहेत. यात आम्ही काय करणार.
भाजप सरकारची लोकपालच्या बाबतीत दुटप्पी भावना असू शकते का?
केंद्र व काही राज्यात भाजपची सत्ता आहे, तेथे तरी भाजपने लोकायुक्त नेमावा, त्यात कोणती अडचण आहे, हे अण्णा हजारे यांचे म्हणणेही पटण्यासारखेच आहे. भाजप विरोधात असताना लोकपाल नियुक्तीबाबत सकारात्मक होता, आता सत्तेत आल्यावर टाळाटाळ होते आहे, हा दुटप्पीपणा आहे. अर्थात यात नवीन असे काही नाही. कारण सत्तेत असणाऱ्या कोणालाही आपल्या डोक्यावर टांगती तलवार नको असतेच. एकेकाळी लोकपाल नेमणुकीसाठी झालेल्या आंदोलनाला पाठिंबा देणारा भारतीय जनता पक्ष सत्तेत आल्यावर मात्र लोकपालाच्या नियुक्तीबद्दल टोलवाटोलवी करीत आहे. यूपीए सरकारच्या काळात लोकपालासाठी अण्णा हजारे आणि मंडळींनी जोरदार आंदोलन केले. त्यामुळे सरकारविरोधी वातावरण चांगलेच तापले. असे म्हटले जाते कि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आणि त्यावेळी विरोधी पक्षात असलेल्या भाजपने या आंदोलनाला रसद पुरवून राजकीय लाभ उठविला. पण सत्तेवर येऊन आता चार वर्षे होत आली, पण भाजप सरकारने लोकपाल नियुक्ती केलेली नाही वा त्यादृष्टीने ठोस पावले टाकलेली नाहीत. उलट लोकपाल नियुक्तीसाठी भाजप सरकार तांत्रिक कारणे पुढे करून टोलवाटोलवीच करीत आहे, असे स्पष्ट दिसते आहे.
भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारने या विधेयकात अनेक बदल केले आहेत. लोकपाल विधेयक, २०११ ज्याला लोकपाल आणि लोकायुक्त विधेयक ,२०११ असे देखील संबोधतात, भारतातील भ्रष्टाचारविरोधी प्रस्तावित कायदा आहे, ज्यामध्ये लोकपालाच्या संस्थेची स्थापना करण्याची तरतूद केली आहे, ज्यामध्ये काही सार्वजनिक संस्थांविरुद्ध ठेवलेल्या भ्रष्टाचाराचा ठपका आणि त्यासंबंधित घटकांची चौकशी केली जाईल.
२०१३ मध्ये प्रस्तावित विधेयकात ही तरतूद करण्यात आली होती. सध्याच्या भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याचे पुनर्स्थित करणे, ज्यात सरकारी सेवकांच्या कारवाईची चौकशी करण्यासाठी सक्षम प्राधिकार्यांकडून आधी मंजुरी घेणे आवश्यक आहे. तत्पूर्वी ही तरतूद फक्त संयुक्त सचिवांच्या पातळीवरील सरकारी अधिका-यांनाच लागू होते. त्यानुसार, 'सुधारणेची चाचणी' असे सुधारित करण्यात आले आहे जसे की कार्यवाही करणाऱ्या एजन्सीजना कोणतीही कृती करण्याआधी भ्रष्ट कृतीची साशंकता सिद्ध करणे अनिवार्य आहे.

भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ -
भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ जम्मू व काश्‍मीर वगळून हा कायदा संपूर्ण भारतभर लागू करण्यात आला आहे, तसेच भारतीय नागरिक परदेशात राहत असले तरी त्यांना तो लागू करण्यात आला आहे. निवडणुका म्हणजे लोकसभा सदस्यासाठीच्या निवडणुका किंवा इतर कायदे बनविणाऱ्या सभागृहाचे सदस्य म्हणजे विधानसभा, राज्यसभा, विधान परिषद किंवा तत्सम निवडणुका. अशा निवडणुकांमध्ये होणारा भ्रष्टाचार या कायद्याच्या कलम ४९ अन्वये गुन्हा ठरतो. हा कायदा लोकसभेत मंजूर करण्यात आला. त्यात सरकारी कार्यालये आणि व्यापारविषयक संस्थांमध्ये होणाऱ्या भ्रष्टाचाराला आळा बसावा हा उद्देश आहे.
हा कायदा प्रामुख्याने लाचलुचपतविषयक भ्रष्टाचाराबाबतचा कायदा आहे. लाच घेणे आणि देणे या दोन्ही गोष्टी कायद्यानुसार गुन्हा असून, तो भ्रष्टाचार म्हणून संबोधला जातो, तसेच अफरातफर करणे म्हणजेच भ्रष्टाचार होय. कार्यालयीन शिस्तपालनात लाच आणि भ्रष्टाचार गैरवर्तन समजून त्यानुसार अशा व्यक्तींना शिक्षा होण्यासाठी कायदा अस्तित्वात आला आहे.

लाच घेणारी व्यक्ती - एखाद्या घटनेमध्ये कलम १६१ नुसार आणि कलम १६५ नुसार असे सिद्ध झाले, की घटनेत दोषी आढळलेल्या व्यक्तीने वस्तू, पैसे त्याला मिळणाऱ्या कायदेशीर पगाराशिवाय घेण्याचे मान्य केले किंवा घेतले किंवा त्या कामाचा वेगळा मोबदला मागितला आणि असे मानले, की त्याला नियमानुसार मिळणारी पगाराची रक्कम कमी आहे आणि त्यासाठी तो अधिक अपेक्षा करीत आहे, तर पिनल कोड १६१ नुसार तो गुन्हा ठरतो. व्यक्ती लाच घेतल्याचे सिद्ध झाल्यास शिक्षा होते.

लाच देणारी व्यक्ती - एखाद्या घटनेमध्ये कलम १६५ अ नुसार एखाद्या व्यक्तीने आपले काम करून घेण्यासाठी काही किमतीवान वस्तू किंवा पैसा एखाद्या कामात ते काम करणाऱ्या व्यक्तीस कायदेशीररीत्या मिळत असलेल्या पगार कमी वाटल्याने देण्याचा प्रयत्न केला असल्यास किंवा त्या कामाचे मोबदल्यासाठी मौल्यवान वस्तू किंवा पैसा दिला असल्यास किंवा तशा प्रकारचे आमिष दाखवले असल्यास तो पिनल कोड 165 अ नुसार गुन्हा आहे. अशा व्यक्तीस शिक्षा होऊ शकते.

लोकपालची अंमलबजावणी का नाही?
२०१३ पासून लोकपाल कायद्याची अंमलबजावणी झाली असली, मात्र भाजप सरकारने या कायद्याची अंमलबजावणी केली नाही, आणि परिणामी, नवीन कायद्यात सक्षम प्राधिकरणाकडून सार्वजनिक सेवकांच्या कृतींच्या विरोधात चौकशी करण्याचे आदेश देण्यास परवानगी देण्यात आली. चौकशी आता विचाराधीन आहे. सर्वोच्च न्यायालयाने लोकपाल नियुक्तीत होत असलेल्या विलंबाबद्दल केंद्र सरकारकडून स्पष्टीकरण मागविले आहे. लोकपाल कधी नियुक्त होणार आणि नियुक्ती प्रक्रियेकरता आतापर्यंत कोणती पावले उचलली याची माहिती सरकारने १० दिवसांत द्यावी असा आदेश न्यायालयाने ३ जुलै २०१८ ला दिला. लोकपाल विधेयकात सुचविण्यात आलेल्या अनेक दुरुस्त्या संसदेत प्रलंबित आहेत, लोकसभेत विरोधी पक्षनेता नसल्याचे सरकारने न्यायालयाला सांगितले होते. लोकपालच्या निवड समितीत पंतप्रधान, लोकसभा अध्यक्ष, सरन्यायाधीश किंवा त्यांच्याकडून नामनिर्देशित सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश आणि विरोधी पक्षनेता सामील असतो.
राज्यसभेत भ्रष्टाचार निवारण विधेयक २०१८ लागू झाले. नक्कीच या कायद्यामुळे देशात कायदा व सुव्यवस्था चांगल्या प्रकारे निर्माण होईल. मात्र ह्या कायद्यात असणाऱ्या बाबी 'भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ शी बऱ्याच प्रमाणात समांतर आहे. अनेक तरतुदी ह्याच कायद्यातील आहेत.

मात्र ज्या लोकपाल बिलसाठी सामान्य जन लढले. आपण संघाच्या राजकारणासाठी वापरून घेतले जात आहोत , उजव्या शक्तीच्या दावणीला बांधले जात आहोत हे त्या वेळेला अनेकांना समजले नव्हते, काही लोक अतिशय शुद्ध भाबडेपणाने तिसऱ्या स्वातंत्र्य लढ्यात वगैरे सहभागी झाले होते मोठे आंदोलन केले गेले जेणेकरून भ्रष्टाचारी कॉंग्रेस जाईल आणि अभ्रष्टाचारी असे भाजप येईल असा ज्यांना गाढ विश्वास होता किमान त्या सर्वांच्या प्रती एक सद्भावना म्हणून तरी भाजपने तोंडदेखले का असेना कोणाची तरी लोकपाल पदी नियुक्ती करायला हवी होती. नाहीतरी आता पर्यंत अनेक उच्च पदांवर बोलक्या बाहुल्या बसवून स्वायत्त संस्था मोडकळीस आणण्याच काम या सरकारने केले आहे त्यात आणखी एका लोकपालाची नियुक्ती जो पर्यंत होत नाही तोपर्यंत या सगळ्या भूलथापा आहेत हे आता जनतेलाही उमगले आहे आणि म्हणूनच लोकशाहीच्या या देशात कागदपत्रात अडकलेले हे महत्वपूर्ण विधेयक स्वतंत्र होऊ शकेल का याची वाट स्वतंत्र भारत आज ही बघत आहे.

Friday 27 July 2018

माहिती अधिकारात बदल करण्याची सरकारला घाई का?

समाज आणि शासनव्यवस्था यांच्यात 'गोपनीयता' नावाची भिंत उभी असते. शासकीय, निमशासकीय कार्यालयातून सर्वसामान्य माणसांना माहिती मिळवताना अनेक वेळा अडचणी उभ्या राहतात आणि ही अडचण गोपनीयतेच्या नावाने अधिकच कठीण केली जाते. यातून मार्ग काढत माहितीचा अधिकार हा कायदा २००५ पासून देशभर लागू करण्यात आला. माहिती अधिकार कायदा लागू झाल्यानंतर पहिल्याच वर्षांत या कायद्याअंतर्गत माहिती मागणारे एक लाख अर्ज दाखल झाले. मात्र याच माहिती अधिकार (आरटीआय) कायद्यात बदल करण्याचा घाट केंद्र सरकारने घातला आहे. सरकारच्या प्रस्तावित बदलांना संसदेने मंजुरी दिल्यास माहिती आयुक्तांच्या सेवेवर सरकारी नियंत्रण येईल.
या कायद्यामुळे सर्वसामान्य माणसाला शासन यंत्रणेमध्ये थोडे का होईना स्थान आणि आवाज मिळाला आहे. गेल्या १४ वर्षांत त्या आधीच्या वर्षांपेक्षा जास्त घोटाळे उघडकीस आणण्याचे काम या कायद्यामुळे झाले आहे. ‘टू जी स्पेक्ट्रम’पासून ‘आदर्श’पर्यंत सर्व घोटाळे उघडकीस आणण्यामागचा शिल्पकार माहितीचा अधिकार कायदा आहे.

थोडक्यात जाणून घेऊया माहितीचा अधिकार कायदा २००५
महाराष्ट्र राज्याने माहिती अधिकाराचा आदेश व त्या खालील नियम दिनांक २३ सप्टेबंर २००२ पासून लागू केला होता. दिनांक १५ जून २००५ रोजी केंद्र शासनाने 'माहितीचा अधिकार कायदा २००५' लागू केला आणि हा कायदा महाराष्ट्र राज्याने १२ आक्टोंबर २००५ पासून लागू केला. या कायद्यामुळे महाराष्ट्र माहिती अधिकार अध्यादेश व नियम २००२ लागू केला आहे. परंतू १२ ऑक्टोबर २००५ पुर्वीच्या अर्जावर पूर्वीच्या कायद्याप्रमाणे म्हणजेच महाराष्ट्र माहितीचा अधिकार अधिनियम २००२ प्रमाणे कार्यवाही करावयाची आहे. १२ ऑक्टोबर २००५ पासूनच्या अर्जावर नविन माहितीचा अधिकार कायदा २००५ प्रमाणे कार्यवाही सुरू आहे. माहिती याचा अर्थ कोणत्याही स्वरूपातील, कोणतेही साहित्य असा असून त्यामध्ये अभिलेख, दस्ताऐवज, ज्ञापने, अभिप्राय, सूचना, प्रसिद्धीपत्रके आदेश, रोजवह्या, अहवाल, कागदपत्रे, नमुने, प्रतिमाने कोणत्याही इलेक्ट्रानिक्स स्वरूपातील साधनसामुग्री आणि त्यावेळी अमंलात असलेल्या अन्य कोणत्याही कायद्यान्वये सार्वजनीक प्राधिकरणास मिळविता येईल अशी कोणत्याही खाजगी निकषाशी संबंधित माहिती याचा संबंध आहे. माहितीचा अधिकार याचा अर्थ कोणत्याही सार्वजनिक प्राधिकारणाकडे असलेली किंवा त्या नियंत्रणात असलेली व या अधिनियमाद्वारे मिळवता येण्याजोगी माहिती मिळविण्याचा अधिकार असा आहे.

माहिती अधिकारात खालील बाबी समाविष्ट आहेत. -
  • एखादे काम दस्ताऐवज, अभिलेख यांची माहिती करणे
  • किंवा अभिलेखांच्या टिपण्या, उतारे किंवा प्रमाणित प्रती घेणे
  • सामग्रीचे प्रमाणित नमुने घेणे
  • इलेक्ट्रानिक प्रकारातील माहिती मिळविणे
भारतीयांसाठी ‘आरटीआय कायदा’ हा लोकशाहीतील सर्वात सशक्त अधिकार आहे. अंदाजानुसार, दरवर्षी चार ते सहा दशलक्ष लोकं माहितीच्या अधिकाराचा अर्ज करतात. भारतातील माहिती अधिकार कायदा हा जगात सर्वात पारदर्शी असा कायदा बनवला गेला आहे. एका अहवालात असे म्हटले आहे कि, माहिती अधिकाराचा वापर ग्रामीण तसेच शहरी भागातील जनता आपल्या मुलभूत सुविधा मिळवण्यासाठी तसेच आपल्या हक्काविषयी जाणून घेण्यासाठी करताना दिसतात.
आरटीआय कायद्याची माहिती तयार करताना आरटीआय वापरकर्त्यांचे प्रोफाइल लक्षात घेणे आवश्यक आहे. केंद्र सरकारने प्रस्तावित कायद्यात दुरुस्ती करण्याऐवजी दुर्दैवाने सामान्य जनतेला माहिती अधिकार कायद्याअंतर्गत यांना सोप्या पद्धतीने आवश्यक ती माहिती विनाविलंब कशी देता येईल यासाठी प्रयत्न करायला हवा.

मोदी सरकार माहितीच्या अधिकार कायद्यात बदल करून लोकशाहीची गळचेपी करत आहे का?
केंद्र सरकारने सार्वजनिकरीत्या जरी स्पष्ट केले नसले तरी सरकारच्या हालचाली या माहितीच्या अधिकारात संशोधन करून त्यात बदल करायचे आहे अशा आहेत. पावसाळी अधिवेशनात अप्रत्यक्षपणे माहिती अधिकार अधिनियमन २००५ यामध्ये संशोधन करण्याचा प्रस्ताव मोदी सरकारचा होता.
मात्र अनेक सामाजिक संस्था, माहितीचा अधिकार लागू करण्यासाठी ज्या लोकांनी पाठपुरावा केला होता अशा लोकांचा माहितीच्या अधिकारात बदल करण्याच्या प्रस्तावाला जोरदार विरोध आहे. त्यांच्या मते, केंद्र सरकारने या प्रस्तावासंदर्भात अनेक बाबी सार्वजनिक केल्या आहेत की नाही हे स्पष्ट केले नाही. शिवाय आरटीआय कायद्यात दुरुस्ती करावी का? कोणतेही विधेयक दुरुस्ती करायचे असेल तर संसदेच्या कोणत्याही तरतुदीमध्ये संबधित व्यक्तींशी विचार विनिमय करणे आवश्यक आहे. नियमांच्यानुसार जर एखादा प्रस्ताव, संशोधन अथवा कायद्यात दुरुस्ती करणार असेल तर त्यावर संबधित विभाग, अथवा त्या विभागचे संकेतस्थळ यावर सर्वप्रथम ती माहिती टाकून त्यावर जनतेचे मत मागवले जाते.

काही प्रकरणात शासन सरकारी वृत्तपत्रांद्वारे देखील संबंधित माहिती प्रकाशित करते. आणि त्यावर लोकांनी आपले मत, सूचना अथवा बदल पाठवावे असे आवाहन करते. या संपूर्ण प्रक्रियेस प्री-लेजिस्लेटिव्ह कन्सल्टेशन पॉलिसी म्हणजे, पूर्व-विधी सल्लासेवा धोरण असे म्हणतात.

परंतु आरटीआय कायद्यात सुधारणा करण्याबाबत असे कोणतेही नियम पाळले गेले नाही. माहितीच्या अधिकारात संशोधन करण्याची ही सर्व प्रक्रिया अत्यंत गोपनीय आहे. काही दिवसापूर्वी संशोधन संबंधित माहिती प्राप्त करण्यासाठी एक आरटीआई फाइल केली होती पण भारत सरकारच्या कर्मचाऱ्यांची व प्रशिक्षण विभागाकडून याबाबत कोणतीही माहिती अद्याप दिली नाहीये.

केंद्रीय माहिती आयोगात २००९ ते २०१२ या काळात माहिती आयुक्त असलेले शैलेश गांधी म्हणतात की, जनतेला या कायद्याच्या बदलाविषयी जाणून घेण्याचा पूर्ण अधिकार आहे, विशेषत: जेव्हा सरकार या कायद्यात दुरुस्तीचा विचार करत आहे. या दुरुस्तीद्वारे सरकार माहिती आयोगाचे हक्क खेचून घेण्याचा प्रयत्न करत आहे. यामुळे या कायद्याच्या अंमलबजावणीवर देखील प्रश्न चिन्ह निर्माण होऊ शकतात. संपूर्ण जगात 'माहिती अधिकार अधिनियमन कायदा २००५' हा सर्वात सोप्पा आणि सुटसुटीत आहे, मात्र या कायद्याची अंमलबजावणी व्यवस्थित करण्यात सरकार अपयशी ठरत आहे.  मला या गोष्टीची भीती आहे कि, सरकार कोणत्या तरी गोष्टीवरून या कायद्यात सुधारणा करण्यासाठी पायवाटा शोधत आहे.

सरकारच्या प्रस्तावित बदलांना संसदेने मंजुरी दिल्यास माहिती आयुक्तांच्या सेवेवर सरकारी नियंत्रण येईल. माहिती आयुक्तांचा कार्यकाळ आणि वेतन निश्‍चित करण्याचा अधिकार सरकारला मिळेल. आरटीआय कायद्यानुसार माहिती आयुक्तांना पाच वर्षांचा निश्‍चित कार्यकाळ मिळतो. मुख्य माहिती आयुक्तांना मुख्य निवडणूक आयुक्तांइतके आणि माहिती आयुक्तांना इतर निवडणूक आयुक्तांइतके वेतन मिळते.
सदर कायद्यामुळे शासन स्तरावरील टू जी स्पेक्ट्रम, कोळसा खाण वाटप, कॉमनवेल्थ, आदर्श, सिंचन असे कितीतरी मोठे गैरव्यवहार उघडीस आले. सामान्य नागरिक आपल्या दैनंदिन शासकीय कार्यालयाशी असलेले कामकाज उदाहरणार्थ रेशन, लायसन्स इत्यादी प्रश्न या कायद्याचा वापर करून सोडून घेण्यास लागले. खरे तर पेपरवेटचा वापर हा टेबलावरील कागद हालू नये म्हणून केला जातो, तर शासकीय कार्यालयांमध्ये नेमकी उलटे घडते. लाचेच्या स्वरुपात 'पेपरवेट; ठेवल्याशिवाय सामान्य लोकांची कामांशी संबंधित कागदपत्रे हालतच नाही, ही परिस्थिती काही प्रमाणात या कायद्याचा प्रभावी वापर होऊ लागल्याने बदललेली आहे. अनेक वेळा शासकीय कार्यालयात लोकांची कागदपत्रे व प्रकरणे गहाळ होत असतात. या कायद्यामुळे सरकारी सेवकांना रेकॉर्ड काही अंशी व्यवस्थित ठेवण्याची सवय लागली.

अधिकाधिक नागरिक या कायद्याचा वापर करू लागल्याने हा कायदा भ्रष्टाचारांच्या मुळावर घाव घालणारा ठरत असल्याचे लक्षात आल्याने भ्रष्टाचारी राजकारणी व अधिकाऱ्यांनी सदर कायद्याची धार बोथट करण्यास सुरू केली आहे. आणि त्याची मुहूर्तमेढ मोदी सरकारने घातली आहे. जनतेसाठी सुरु केलेल्या माहितीच्या अधिकारामुळे सत्य जाणून घेण्याचा अधिकार लोकशाहीत लोकांना मिळाला आहे. मात्र मोदी सरकार लोकांसाठी निर्माण केलेल्या कायद्यात हस्तक्षेप करत, सामान्य नागरिकांच्या हक्कावर गदा आणत आहे. त्यामुळे नक्की पाणी कुठे मुरत आहे असा सवाल जनतेच्या मनात येत आहे.

एकूणच आगामी काळात हा कायदा परिणामकारक होण्यासाठी जास्तीत जास्त माहिती स्वत:हून घोषित करणे, कायदा सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न व आर्थिक तरतूद करणे, पुरेशा प्रमाणात माहिती आयुक्त नेमणे व मुख्य म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांची मालकीभावना काढून विश्वस्ताची भावना आणणे आणि कायद्याचा दुरुपयोग करणाऱ्यांवर कारवाई करणे अशा गोष्टी झाल्या तर हा कायदा खऱ्या अर्थाने क्रांतिकारक ठरेल. असे मला वाटते. या कायद्याचा दुरुउपयोग नागरिकांकडून अथवा सरकारकडून देखील होता कामा नये. ही भावना सर्वसामान्यांमध्ये रुजणे आवश्यक आहे. हा कायदा आपल्या व्यवस्थेत गेल्या अनेक वर्षांत निर्माण झालेल्या त्रुटी व चुकीच्या गोष्टींचे दिशादर्शन करण्यासाठी आहे, या सकारात्मक भावनेने शासकीय अधिकाऱ्यांनी या कायद्याकडे पाहायचे ठरवले, तर या कायद्याचा उद्देश सफल होऊन खरे प्रजासत्ताक निर्माण होऊ शकेल.
 https://marathi.netive.in/proposed-changes-to-rti-act-will-complicate-seeking-information-government/