Tuesday 16 June 2020

कोरोनाने झालेला मनस्ताप काही औरच !

कोरोनाने झालेला मनस्ताप काही औरच !

एकीकडे राज्यात कोरोनाचा कहर वाढतोय.  औरंगाबादमध्ये सुद्धा परिस्थिती तीच होती. सतत तेच तेच वाचून, लिहून, आणि बघून डोक्याचा भुगा होत 8 श्वास घेताना दम लागला मात्र 2 तासापासून बुलेटिन सुरू आहे कदाचित म्हणून त्रास होतं असेल म्हणून दुर्लक्ष केलं मात्र तेव्हा धोक्याची घंटा ओळखायला हवी होती हे चुकलंच...! 
अजून एक दिवस गेला आणि मी कल्याणला आले. रस्त्यात असताना ऑफिसमधील माझ्या जवळ बसणारे सहकारी पॉजेटीव्ह आले असं कळलं तेव्हा थोडी भीती वाटली आणि लगेच दुसऱ्या दिवशी टेस्ट करायला गेले. यात ज्यादिवशी घरी आले त्याच दिवशी घरातील आमचं पाळीव जनावर (कबिरा)मरण पावलं ज्याचं प्रचंड दुःख झालं होतं खूप खूप रडले होते मी, रडून रडून डोकं बघिर झालं संपूर्ण घरं भर खेळणारा जीव एकाएकी आम्हाला सोडून गेला हे सहन होतं नव्हतं. यानंतर वेळ आली टेस्ट करण्याची...

मनपाचा कारभार -
नेमकं टेस्ट करायला कधी जायचं?  कोण करतं? प्रायव्हेट लॅब की सरकारी असे अनेक प्रश्न पडले. स्थानिक पत्रकारांच्या मदतीने लॅबचा नंबर मिळवला. फोन केला उत्तर समाधानकारक मिळालं नाही. मग फोन केला राजकीय पक्षाच्या एका कार्यकर्त्याला जो 10 व्या मिनिटाला गेट बाहेर होता. सरकारी हॉस्पिटलच्या आवारात असणाऱ्या प्रायव्हेट लॅबमध्ये टेस्ट करायचं ठरलं. जिथे प्रचंड अरेरावी पहायला मिळाली पण टेस्ट तर करायची होती. अखेर आज या, उद्या 8 ला या, 2 पुढे आम्ही थांबत नाही अशा सगळ्या थापा झेलत स्वतः तिकडे पोहचून एक घाव 10 तुकडे करत टेस्ट केली...

३ दिवसांनी रिपोर्ट आला... 
11 वाजता आमचे मानस बंधू अत्यावश्यक सेवेची गाडी घेऊन गेटवर आले. हॉस्पिटलमध्ये पोहचल्यावर 3 दिवसांपेक्षा गर्दी अधिक पाहायला मिळाली. रिपोर्ट घेताना लालफितीचा कारभार आणि अरेरावीत झालेली वाढ बघून अजून राग आला आणि रिपोर्ट अखेर मिळाला. माझी टेस्ट करणारी बाई "तुम्ही घरी जा ताबडतोब असं म्हणाली" मला वाटलं इथे असणाऱ्या रुग्णांची लागण होऊ नये म्हणून असं बोलत असेल, मी तो कागद घेतला आणि निघाले. 5 पाऊल चालल्यावर नीट तो कागद वाचला ज्यावर मी खरं तर 'निगेटिव्ह' हा शब्द शोधत होते म्हणून 'Detected' वर नजर पडली नाही. डोळ्यावर विश्वास बसत नव्हता, अचानक धडधड वाढली होती, पुन्हा घाम फुटला आणि तितक्यात मोबाईलच्या स्क्रिनवर 'आई' नाव दिसलं. काय सांगू तिला? आयुष्याच्या प्रत्येक पायरीवर पास होतं गेलेली मी. माझ्या हातात कोरोनाच्या लढाईत नापास झाल्याचा रिपोर्ट आहे.  😢 दुःख मला कोरोना झाल्याचं नव्हतं. पण आता त्यांच्या टेस्ट होणार, माझ्यामुळे त्यांना काही झालं तर मी काय करू? मला काहीच कळतं नव्हतं. डोक्यात केमिकल लोचा झाला होता. डोळे पुसले सोबत असणाऱ्या भावाला म्हणाले तू जा तुझ्या घरी. मी घरी चालत जाते, तो सुद्धा खूप घाबरला होता. ताई इथंपर्यंत सोबत होतो, असा कसा सोडू! चल घरी पटकन आणि मी घरी पोहचले...

Quarantine कुठे? घरी की हॉस्पिटल - 
पालिकेच्या हॉस्पिटलमधून फोन आला, बेसिक चौकशी केली. त्या मनस्थितीत विचारलेल्या प्रत्येक प्रश्नांची उत्तर दिली. सोबत मला घरी राहू द्या तसा GR आहे अशी विनंती केली. माझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर माझ्याशी बोलणाऱ्या बाई त्यांच्या सिनियरला विचारत होत्या. तुम्ही घरी राहू शकता तुम्हाला सोसायटीची NOC आणि महापालिका रुग्णालयाच्या आरोग्य अधिकाऱ्यांचे पत्र लागेल. ते पत्र तुम्ही काढून आणा आणि मग घरी राहा मी म्हणाले मी स्वतः बाधित आहे. हा कोणता तुमचा नियम ? त्या बाई म्हणाल्या अरे हो ते पण बरोबर आहे. मी पुन्हा आमच्या बंधूंना फोन केला. बंधूनी प्रचंड राडा केला. आमचे बंधू वयाने लहान असले तरी राजकीय कट्टर कार्यकर्ते असल्याने रुग्णालयांच्या CMO ला भेटून तुम्ही हे काय मागता? म्हणून जाब विचारला तिकडून उत्तर आलं - 'असा कोणताही GR आम्हाला माहीत नाही, गाईडलाईन्स नाही, महाराष्ट्र शासनाचा तो निर्णय असला तरी KDMC कडे त्याची माहिती नाही. तुम्हाला रुग्णालयात जावं लागेल. त्यानंतर माझ्याशी फोनवर बोलणाऱ्या बाईंनी माफी मागितली. तुम्हाला झालेल्या मनस्तापाबद्दल माफी मागते. आम्हाला स्वतःला काहीही नीट माहीत नाही समजून घ्या अशी विनंती केली. पुढच्या 10 मिनिटात रुग्णवाहिका पोहचेल तुम्ही तयार व्हा. कदाचित मला ते 2 तास नीट मांडता येणार नाहीत पण ह्यात मध्येच घरी राहायला मिळणार हा आनंद आणि लगेचच तुम्हाला हॉस्पिटलमध्ये जावं लागणार ही तंबी खूप नैराश्य देणारी होती.. 

अखेर औरंगाबादवरून आणलेली माझी तीच बॅग उचलली.  ऍम्ब्युलस आली PPE किट घातला, बाहेर आई-वडील पुरते हादरले होते. रंगानी बहरलेली मी अशा पांढऱ्या किटमध्ये खूप भकास दिसत होती पण तो PPE किट घातल्यावर.....,  तुम्हा सगळ्यांना हसू येईल, काही लोकं मला जज करतील ही पण मी, माझ्या बेडरूमच्या कपाटाला असणाऱ्या आरशासमोर 'मिरर सेल्फी' घेतला ज्या सेल्फीत मी आणि माझ्यामागे माझ्या आई-वडिलांचा फोटो आहे. घरातून निघताना मला सगळ्यात जास्त आवडणारी गोष्ट मी केली.. डोळे पुसले, एक मोठी स्माईल दिली. जगासाठी तुम्ही खूप चांगले, यशस्वी व्यक्ती आहात मात्र आपल्यापुरता आपण हतबल आणि असहाय्य रुग्ण असतो हे खरं पण आपणच आपल्याला बरं करू शकतो हे ही तितकंच खरं... 

दाराचा उंबरठा ते सोसायटीचा गेट आणि समोर असणारी रुग्णवाहिका इथंपर्यत टाकलेली पाउल, आणि मला पाहणाऱ्या नजरा मी विसरू शकतं नाही.... 
ऍम्ब्युलसचा दरवाजा जोरात लागला, तो सायरनचा आवाज सुरू झाला.. त्या खडकीतून समोर डोळ्यातून ओघळणारे अश्रू मला कमकुवत करत होते, पण तरी मी हाक मारली जोरात "आईईईई मला काही नाही झालं मी लवकरच येते... गेटवर असणारे पोलीस आईशी बोलायला गेले मी इतकचं पाहिलं आणि गाडी सुटली... 

डोळ्यांतील अडवून पाणी, हुंदका रोखुनी कंठी
तुम्ही केविलवाणे हसता अन् तुम्हास नियती हसते....
हे भलते अवघड असते !