Tuesday 14 October 2014

मतदानाचा खरा हक्क...

तरुण मित्रानो याचाही अभ्यास करा.
महाराष्ट्र विधान सभेच्या निवडणुका आता फक्त कांही दिवसावर आल्या आहेत.आपले अनेक तरुण मित्र हे कदाचीत प्रथमच या निवडणुकीत मतदान करून आपला लोकशाहीतील मतदानाचा हक्क बजावतील,पण खर सांगू या निवडणुका कशासाठी असतात? मतदान कोणत्या विचाराने करायचे ?का करायचे?याचे सर्वांनाच भान असतेच असे नाही.
भारत स्वतंत्र झाल्यावर महाराष्ट्रात ज्या काही महत्वाच्या चळवळी झाल्या त्या त्या वेळी मतदारांनी आपल्या मतांव्दारे त्या बद्दलच्या स्पष्ट भावना आपल्या मतांद्वारे व्यक्त केल्या आहेत.१९५७ साली संयुक्त महाराष्ट्र लढ्याच्या आणि तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आणीबाणी जाहीर त्या वेळी मतदारांनी निश्चित असा विचार करून राज्य कर्त्यांना योग्य काय ?अयोग्य काय हे दाखवून दिले.राजकीय विश्लेषकांचे आराखडे त्यावेळी पूर्णपणे चुकीचे ठरले.भारतात साक्षरतेचे प्रमाण कमी असले तरी भारतीय हा विचारांनी परिपक्व आहे हे दाखवून दिले.अलीकडच्या काळात हे असे दृश्य का दिसत नाही असा प्रश्न पडतो.तरुणांनी याचा विचार केला पाहिजे.
गेल्यावेळी लोकसभेच्या निवडणुका झाल्या.या निवडणुकीत ‘अछेदिन आयेंगे’ या आश्वासनाला भुलून दिल्लीत सत्तांतर घडवून आणण्यात आले.त्यात तरुण मतदारांचा महत्वाचा सहभाग होता.केंद्रात भाजपा-सेना युती सत्तेत आली. भाजपाचे संख्याबळ अधिक होते.या बदललेल्या राजकीय परिस्थितीत म्हणजेच कॉंग्रेस सरकारच्या पूर्वीच्या धोरणात या सरकारकडून काही बदल झाला का? मागील धोरणे आजही तशीच चालू राहिली आहेत.हे आपल्या लक्षात आले आहे का? नरेंद्र मोदींनी पंतप्रधान पदाची सूत्रे हाती घेताच त्यांनी जपान,चीन आणि अमेरिकेचा दौरा केला.या दौऱ्यात त्यांनी तेथील भांडवलदारांनी भारतात विदेशी गुंतवणूक करावी अशी औजळ पसरून आर्जवे केली. मित्रानो इथे थोडा विचार करा हीच नेमकी भूमिका कॉंग्रेसचे पंतप्रधान मनमोहन सिंग यांची होती.त्यांच्या अन्नसुरक्षा मुद्यांचा मोदींनी प्रकर्षाने विचार केला पण सत्तेत आल्यावर शिक्षण,आरोग्य,सतत वाढती प्रचंड महागाई या अशा प्रश्नांवर मोदी पूर्णपणे मुग गिळून बसले आहेत.याचाच अर्थ सत्तेतील माणसे बदलली तरीही मागचेच धोरण पुढे चालू आहे.मग अच्छे दिन कसे येणार याचा विचार करा! नरेंद्र मोदी यांचे एकूण जीवन,राजकीय कारकीर्द याचाही विचार या निवडणुकीत महत्वाचा ठरतो.त्याना गांधीजींच्या नावापुढे महात्मा शब्द उच्चारताना खूप क्लेश होत ते महात्मा गांधी न म्हणता राष्ट्रपती असे म्हणत.त्याच मोदींनी अमेरिकेत गांधीजींच्या पुतळ्यावर डोके टेकले.भारतात महात्मा गांधी जयंती निमित्त ‘स्वच्छ भारत अभियान’ची घोषणा केली ,ही घोषणा यापूर्वी गुजरातमध्ये करता आली असती.अशी सर्व नाटके करण्यापेक्षा मोदिनी जागतिकी करणाची आर्थिक धोरणे.बदलली असती तर सर्वाना विशेषत: तरुण मित्राना नवी दिशा ,नवे मार्गदर्शन मिळाले असते पण मोदींची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी बांधिलकी असल्याने आणि संघ परिवाराचे कॉंग्रेसशी मैत्रीचे नाते असल्याने तसे करणे त्याना शक्य नव्हते. लोकसभा निवडणुकीत ‘अच्छेदिन आयेंगे’ही घोषणा खूप गाजली पण हे दिवस कसे कधी येणार हे ते सांगत नाहीत.भारताचे आर्थिक नियोजन,व नियोजन आयोग यामुळे भारतातील उद्योगपती नाराज होते.त्याना हायसे वाटावे म्हणून कॉंग्रेस सत्तेने उद्योगपतींना ज्या कर सवलती दिल्या त्या चालूच ठेवण्याचे, त्यात वाढ करण्याचेच धोरण मोदी सरकारने जाहीर केले आहे. जागतिकी करणाचे दुष्परिणाम सर्व जग अनुभवत आहे.यामुळेच भारतात बेकारी, विषमता ,प्रदूषण यात प्रचंड वाढ झाली आहे.अंतर राष्ट्रीय श्रम संघटनेने वाढत्या बेकारी विरुद्ध आवाज उठविला आहे. भारतातीलच उदाहरण घेतले तरी गेल्या १५-२० वर्षात एका बड्या उद्योग समुहाने ४५ हजार कामगारांची कपात केली.इतर उद्योगांनीही ठेकेदारी पद्धतीला प्राधान्य देण्यास सुरवात केली आहे.भारतात ११कोटि ३०लाख बेकार आहेत.आर्थिक विषमता वाढत आहे,गरीब श्रीमंत यातील दरी वाढतच आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी न होता गेल्या २० वर्षात ३० लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत .ही सर्व परिस्थिती बदलण्यासाठी तरुणांनी आता कंबर कसली पाहिजे. आपल्या शिक्षणाचा ,बुद्धीचा उपयोग देशासाठीच कसा होईल हे पहाणे जरुरीचे आहे. त्यासाठी समाज परिवर्तनाची गरज आहे.ते काम तुमच्यासारखे तरुणच करीत असल्याने आपण ज्या पक्षाला उमेदवाराला समर्थन देतो.त्याची वैयक्तिक पात्रता ,आर्थिक स्थिती ,देश प्रेमाची भावना,आपल्या मतदार संघाच्या समस्यांचा अभ्यास हे सर्व पाहून मतदानात सर्व तरुणांनी सामील झाले पाहिजे.