Saturday 4 February 2017

मराठी साहित्य संमेलन : एक अनोखी पर्वणी..

 आज पर्यंत मराठी साहित्य संमेलनाविषयी खूप काही ऐकले होते. मराठी साहित्य संमेलनाविषयी वाचून मनात एक उत्सुकता होती. नेमकं मराठी साहित्य संमेलनात काय काय होत असेल याचे कुतूहल होते आणि काल प्रत्यक्ष मला या साहित्य संमेलनाची साक्षीदार होण्याची संधी मिळाली. डोंबिवलीच्या सावळाराम क्रीडा संकुल गृहात या संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. भव्य पटांगणात अनोख्या पद्धतीने आकर्षक अशा भव्य – दिव्य सेटची उभारणी पाहून संमेलनाची महती समजून येत होती. संमेलनाच्या प्रवेशद्वाराजवळ उभारण्यात आलेल्या देखाव्याजवळ लहान मुलांपासून, तरुणाई आणि जेष्ठ मंडळी सुद्धा हौसेने फोटो काढताना दिसत होते. भल्या मोठ्या पटांगणात बसण्याची अचूक व्यवस्था करण्यात आली होती. वातावरणात साहित्य संमेलनाचा सूर मिसळला होता. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर या ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार झाल्याचे समाधान पाहून खूप बरे वाटत होते.                अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे ९० वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन डोंबिवली येथे दि. ३ ते ५ फेब्रुवारी २०१७ या कालावधीत होत आहे. डोंबिवली शहराला सांस्कृतिक शहर म्हणून ओळखलं जातं तसेच विविध भाषा, जातीचे, संस्कृतीचे, साहित्यिकाचे शहर म्हणून डोंबिवलीला जगभरात एक वेगळीच ओळख आहे. अश्या लोकजीवनाचे विविध पैलू दर्शवणाऱ्या ऐतिहासिक शहरात साहित्य संमेलन आयोजित केल्यामुळे डोंबिवलीसह आजूबाजूच्या उपनगरातील लोकांचा उत्साह भरभरून पाहायला मिळाला. माहिती व जनसंपर्क विभागात आंतरवासिता म्हणून काम करत असल्यामुळे  या साहित्य संमेलनाला जाण्याची संधी मिळाली, आणि मराठी भाषेची समृधता किती मोठी आहे. याची अनुभूती अनुभवायला मिळाली. आजच्या तरुणपिढीसाठी थोर-जेष्ठ साहित्यिकांनी निर्माण केलेल्या साहित्याची व्यापकता पाहून मराठी साहित्य संमेलनाची खरी गरज लक्षात येते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, संमेलनाध्यक्ष डॉ. अक्षयकुमार काळे,  मावळते अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस, स्वागताध्यक्ष गुलाब वझे, महापौर राजेंद्र देवळेकर, प्रख्यात हिंदी कवी विष्णू खरे, समीक्षक डॉ. म. सु. पाटील यांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा पार पडला. यावेळी ग्रंथदिंडी सुद्धा निघाली. ग्रंथदिंडीत सहभागी झालेल्या साहित्यप्रेमींनी या भव्य सोहळ्याची आपल्याजवळ कायम स्वरूपी आठवण राहावी म्हणून अनेक लोकांनी चित्ररथ आणि संमेलनाच्या प्रवेशद्वाराजवळ सेल्फी काढण्याचा मनमुराद आनंद लुटला. मराठी भाषेमध्ये उपलब्ध असणाऱ्या साहित्याची विद्यार्थ्यांना ओळख व्हावी, साहित्य संमेलनाची व्यापकता समजावी आणि नव्या पिढीने या साहित्याचा वापर आपल्या स्वताच्या भाषेत करावा म्हणून या संमेलनाला १ लाख विद्यार्थ्यांना निमंत्रण देण्यात आले.
              कल्याण- डोंबिवली शहराच्या अनेक शाळा महाविद्यालयातून विद्यार्थी ग्रंथदिंडी आणि संमेलनात सहभागी झाले होते. डोंबिवलीकर सांस्कृतिक परिवाराने साकारलेल्या चित्ररथावर साहित्य विश्वात गाजलेल्या ऐतिहासिक कादंबऱ्यांची प्रतिकृती उभारण्यात आली होती. रंगीबिरंगी कादंबरी आणि पुस्तके सर्वाचे लक्ष वेधून घेत होते. याचबरोबर संमेलनात ग्रंथग्राम हे पुस्तक प्रदर्शनाचे दालन साहित्य रसिकांचे विशेष आकर्षण ठरले. या ग्रंथग्राम दलानाबदल बोलताना डॉ श्रीपाल सबनीस म्हणाले. यंदाचे साहित्य संमेलन म्हणजे मराठीच्या ज्ञानाची मातोश्री आहे. या मातोश्रीवर कोणत्याही जातीधर्माचा भेद न करता सर्वाना समान ज्ञान मिळते, याचे उदाहरण त्यांनी मराठी मातीत उपलब्ध असणाऱ्या ग्रंथांची नावे घेऊन केली. मराठी भाषेमध्ये उपलब्ध असणाऱ्या एका पेक्षा एक दर्जेदार कादंबरी, ग्रंथ, साहित्याची माहिती होत असताना आपल्या मातृभाषेविषयी मनात खूप आदर निर्माण होत होता. साहित्य संमेलनाच्या इतिहासात यंदा प्रथमच ३६५ ग्रंथ पुस्तकांचे विक्रीचे स्टोल उपलब्ध करून देण्यात आले होते. यामुळे महाविद्यालयाच्या तरुणांपासून ते जेष्ठ व्यक्तीपर्यंत अनेक वाचनप्रेमीमध्ये आनंदाचे वातावरून दिसून येत होते. मराठी साहित्याचा वारसा जपण्यासाठी.. आपल्या मातृभाषेविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी डोंबिवलीतील हे साहित्य संमेलन नक्कीच एक पर्वणी ठरत आहे.                                                                                                                                                
                                                                                                                                               अमृता आनप
                                                                                                                                                                                                                                                                                            amrutahanap23@gmail.com