Friday 29 July 2016

बदलत्या तंत्रज्ञानाची लोकशिक्षणात भूमिका...........


शिक्षण व्यवस्थेतील बदलासाठी इंटरनेटचे महत्त्व पटवून देण्यासाठी सध्या विविध मोबाईल कंपन्याची चढाओढ लागली आहे… कोणी आयआयटीमध्ये जाण्यापेक्षा इंटरनेटच्या सहाय्यानेच आयुष्य कसे बदलेल याची आयडीया सुचवित आहे… तर कोणी इंटरनेटच्या सोबतीने पाहिजे ती गरज स्वत:च भागवू शकत असल्याचे सांगत आहे…या जाहिरातींनी
शिक्षणात आता टेक्नॉलॉजीची आवश्यकता असल्याची गरज हेरली आहे… हे खरं आहे… पत्रकारितेची विद्यार्थी म्हणून या जाहिरातींचा अभ्यास करीत असतानाच आज मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे यांनीही अशीच गरज अधोरेखील केली. 


माहिती व जनसंपर्क विभागात आतंरवासिता करीत असताना मला दररोज नवनवीन अनुभव येत आहेत… याच श्रृंखलेत आज थेट कुलगुरूंशी संवाद साधण्याची संधी मिळाली… ‘बदलत्या तंत्रज्ञानाची लोकशिक्षणात भूमिका’ याविषयावर आधारित व्याख्यानातून शिक्षणतज्ज्ञ व कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे यांनी दर्जेदार शिक्षणप्रणाली आपली प्रखर मत मांडून आम्हा विद्यार्थ्यांना शिक्षणप्रणालीकडे पाहण्याची एक नवीन दृष्टी दिली… या कार्यक्रमाला संचालक अजय अंबेकर, संचालक (प्रशासन) देवेंद्र भुजबळ, संचालक (माहिती) शिवाजी मानकर यांच्यासह माहिती विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

दिवसेंदिवस शिक्षणाचा खर्च वाढत आहे. पहिले काही हजारात मिळणाऱ्या शिक्षणाचा आकडा आता लाखोंचा घरात पोहोचला आहे… हे थांबविण्यासाठी सरकार आपल्या पद्धतीने प्रयत्न करीत आहे. पण या समस्येचे उत्तर तंत्रज्ञानात आहे. नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर आपल्या शिक्षण प्रणालीत केल्यास चार भिंतींच्या आड मिळणारे ज्ञान ‘मुक्त’ होऊन ज्ञानगंगा घरोघरी पोहोचेल असा विश्वास डॉ. साळुंखे यांनी व्यक्त केला.

एक विद्यार्थी म्हणून यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या कुलगुरुंचे तंत्रज्ञानाची लोकशिक्षणात मुख्य भूमिका आहे असे सांगितले. बदलत्या तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करता येऊ शकतो. ज्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांलाही फायदा होईल अशी खात्री पटली. डॉ. माणिकराव साळुंखे यांच्या जीवनावर प्रकाश टाकताना भुजबळ सरांनी सांगितले की, त्यांनी आजपर्यंत ४० विद्यार्थ्यांना पीएचडीसाठी मार्गदर्शन केले आहे. सेंद्रीय रसायन शास्त्रात त्यांनी स्वत: पीएचडी केलेली हे ऐकूनच मी अवाक झाले. शिक्षण पद्धतीत काम करणारे लोक विद्यार्थ्यांना नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती, नवे अभ्यासक्रम, कोर्सेस, देण्यासाठी झटत आहेत. इतका मोठा अनुभव असून सुद्धा आम्हा विद्यार्थ्यांशी त्यांनी मुक्तपणे संवाद साधला याचे अप्रुप वाटले.

एक विद्यार्थी म्हणून शिक्षण पद्धती विषयी माझ्या मनात अनेक प्रश्न होते ज्याची उत्तरे कुलगुरू साळुंखेनी सहज आणि सोप्पी करून सांगितली. आमच्याशी संवाद साधत असताना त्यांच्या समृध्द संशोधनाची प्रचिती वेळोवेळी येत होती. विद्यार्थ्यांना भारतात उपलब्ध असणाऱ्या तंत्रज्ञानाची माहिती देत असताना त्यांनी विदेशातील शिक्षण क्षेत्रातील तंत्रप्रणाली देखील उलगडून सांगितली. शिक्षण ही लाईफ लाँग जर्नी आहे हे त्यांनी त्यांच्या अनुभवातून समजावनू सांगितले. ज्ञानगंगा घरोघरी हे नाशिक विद्यापीठाचे ब्रीदवाक्य कशा प्रकारे सार्थ आहे, हे डॉ. साळुंखेंच्या अनुभवातुन मला समजले. व्याख्यानमालेच्या उत्तरार्धात आम्हा विद्यार्थ्यांकडून विचारण्यात आलेल्या प्रश्नांची त्यांनी मनमोकळी उत्तरे दिली. या कार्यक्रमात माहिती जनसंपर्क महासंचालनालयाचे अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते ज्यांनी विद्यार्थ्यांना प्रश्न विचारण्यासाठी प्रोत्साहन दिले. अशा दिग्गज व्यक्तींकडून शिक्षण क्षेत्राविषयी येणाऱ्या नवीन तंत्रज्ञान, ॲप्स, कोर्सेसविषयी माहिती जाणून घेण्याची मला संधी मिळाली याचा मला खूप आनंद आहे. माझ्या भावी आयुष्यात बदललेल्या तंत्रज्ञानाचा उपयोग माझ्या शिक्षण प्रवासात होईल. एवढं मात्र नक्की.
-अमृता आनप